वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील उद्धट गावच्या हद्दीत ओढ्यामध्ये अंदाजे एक ते दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक निर्वस्त्र व बेवारस अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत अर्भकाला तातडीने मदत केली. त्यानंतर वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला शासकीय महिला रुग्णालय, बारामती येथे दाखल केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.
वालचंदनगर पोलीस ठाण्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार, शुक्रवार (दि. १३ नोव्हेंबर) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उद्धट गावच्या हद्दीत विशाल गायकवाड यांच्या प्लॉटिंगसमोरील ओढ्यामध्ये नवजात पुरुष जातीचे अर्भक निर्वस्त्र व बेवारस अवस्थेत पडलेले होते. यावेळी सुभाष इंगोले (वय ४२, रा. उद्धट, ता. इंदापूर) यांच्या निदर्शनास ही बाब आली. अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्यांनी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली असता ओढ्यामधील गवतामध्ये नवजात अर्भक पडलेले असल्याचे दिसून आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुभाष इंगोले यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अर्भकाला उचलले. स्वतःच्या कपड्यांमध्ये गुंडाळून त्यांनी त्याला बारामती येथे नेले व त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घेतले. त्यानंतर वालचंदनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी तातडीने दखल घेतली. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने नवजात अर्भकाला पुढील उपचारासाठी शासकीय महिला रुग्णालय, बारामती येथे दाखल करण्यात आले. सध्या अर्भकावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नवजात अर्भकाला जन्म दिल्यानंतर त्याच्या संगोपन व पालनपोषणाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने त्याला ओढ्यामध्ये निर्वस्त्र व बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या कृत्यामुळे नवजात अर्भकाच्या जिवाला व आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.
या घटनेतील अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या तपासासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
उद्धट व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, स्थानिक नागरिकांकडे चौकशी करणे, तसेच बारामती, इंदापूर व नातेपुते विभागातील रुग्णालये आणि प्रसूतिगृहांकडून माहिती संकलित करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे अर्भकाला बेवारस सोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
या घटनेबाबत कोणत्याही नागरिकाकडे माहिती असल्यास त्यांनी तात्काळ वालचंदनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वालचंदनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
