Headlines

चौफुला येथे वाहतूक कोंडीचा कहर; पोलीस प्रशासन मस्त, नागरिक त्रस्त!वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोकळा श्वास कधी मिळणार?

दौंड तालुक्यातील चौफुला येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुपा-शिरूर पुलाजवळ रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. चौफुला परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली असून, वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महत्त्वाचे वाहतूक केंद्र असलेल्या चौफुला येथे वाहनांची मोठी वर्दळ असतानाही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चौफुला परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक, विद्यार्थी, प्रवासी, रुग्णवाहिका आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे काही वाहनचालक आणि नागरिक स्वतः पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेची प्रभावी उपस्थिती दिसत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

पोलीस प्रशासन नेमके करते तरी काय?
चौफुला परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या, गुटखा विक्रीच्या संशयास्पद टपऱ्या, तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे फळांचे हातगाडे यांच्यामुळे वाहतुकीच्या समस्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय, काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून अशा व्यावसायिकांकडून कथितरीत्या अवैध वसुली होत असल्याच्या चर्चाही परिसरात सुरू आहेत. या आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एकीकडे वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे वाहतूक नियोजनाचा अभाव का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियमित कर्मचारी तैनात केले जातात का, बेशिस्त पार्किंगवर कारवाई होते का आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाते का, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

वाहतूक कोंडीचा मोकळा श्वास नागरिकांना कधी मिळणार?
चौफुला येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियमित वाहतूक पोलीस तैनात करणे, अवजड वाहनांचे नियोजन करणे, बेशिस्त पार्किंगवर कठोर कारवाई करणे, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालणे आणि रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चौफुला येथील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार का? पोलीस प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी आणखी किती काळ लागणार? की नागरिकांनी वाहतूक कोंडीतच आपला वेळ घालवायचा?

पोलीस प्रशासन मस्त, नागरिक मात्र वाहतूक कोंडीत त्रस्त! आता तरी वरिष्ठ अधिकारी जागे होणार का, हा खरा प्रश्न आहे.