आंबेगाव तालुक्यात पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व…

Photo of author

By Sandhya

NCP’s undisputed dominance in Pune Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Ambegaon taluka…


आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश संपादन करत तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ३ तर पंचायत समितीच्या १० पैकी तब्बल ८ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवले. शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांच्या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. या आघाडीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आघाडीवर
शिनोली–बोरघर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीला राजेंद्र लोहकरे या १०,३६७ मते मिळवत विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सरिता माळी यांचा ३,६४२ मतांनी पराभव केला.
पेठ–घोडेगाव गटात शिवसेनेच्या सुवर्णा दरेकर यांनी ११,६७४ मते मिळवत राष्ट्रवादीच्या मंगल हुले यांचा ३०६ मतांनी पराभव केला.
कळंब–चांडोली गटात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रीती थोरात या १५,६११ मते मिळवत १,५६१ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या तुलसी भोर यांचा पराभव केला.
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक–जारकरवाडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक वळसे पाटील १३,८०९ मते मिळवत २,८०७ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे अरुण गिरे यांचा पराभव केला.
अवसरी बुद्रुक–पिंपळगाव गटात राष्ट्रवादीचे विष्णू काका हिंगे पाटील १०,८७८ मते मिळवत ६०५ मतांनी विजयी झाले.
पारगाव–जारकरवाडीतील हायव्होल्टेज लढत
पारगाव–जारकरवाडी गटात झालेली लढत विशेष चर्चेची ठरली. माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा २९९२ मतांनी पराभव करत बाजी मारली.
निवडणुकीपूर्वी अरुण गिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून विवेक वळसे पाटील मैदानात उतरले. शिंदे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांनी एकत्र येत एकच उमेदवार दिल्याने थेट एकास-एक लढत रंगली.
विवेक वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पारगाव येथे जाहीर सभा झाली होती. मोठे शक्तीप्रदर्शन झाले, तरीही वळसे पाटील यांनी मतदारांचा विश्वास संपादन करत एकहाती विजय मिळवला. विशेष म्हणजे, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील प्रचारात सहभागी नव्हते. प्रचाराची धुरा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांभाळली.
पंचायत समितीतही राष्ट्रवादीचे वर्चस्व
पंचायत समितीच्या आठ जागा जिंकत राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. बोरघर गणात संजय गवारी, शिनोलीत ज्योती पारधी, घोडेगावात कैलासबुवा काळे, पेठमध्ये संजय पवळे, कळंबमध्ये उषा कानडे, जारकरवाडीत अंकिता वाळुंज, पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथे शिवाजी निघोट आणि अवसरी बुद्रुक येथे निलेश टेमकर यांनी विजय मिळवला.
काही गणांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षालाही यश मिळाले. चांडोली बुद्रुक येथे प्रियंका वाघ तर पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे श्वेता ढोबळे विजयी झाल्या.
राजकीय चित्र स्पष्ट
या निकालामुळे आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे वर्चस्व वाढल्याने आगामी राजकीय समीकरणांवर या निकालाचा परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विवेक वळसे पाटील यांना जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page