Infrastructure in Chakan MIDC collapsed, roads became death traps


रस्त्यालगत खोदलेली गटारे, कचऱ्याच्या जंजाळात अडकलेले विद्युत जनित्र, सांडपाणी, रस्त्यावर जाळला जाणारा कचरा, जनावरांनाही चालताना लाज वाटेल असे झालेले रस्ते, विजेचा सुरू असलेला लपंडाव त्यात चाकण, एमआयडीसी व वाड्यावस्त्यांवरील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यूचे सापळे बनले आहेत.
चाकण एमआयडीसीतील रस्ते पूर्णपणे खड्ड्यात गेले आहेत. नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी, वाघजाईनगर आदी ठिकाणच्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेजला झाकणे लावलेली नसून काही ठिकाणी खोदण्यात आलेली गटारे बुजवली नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. चाकण एमआयडीसीतील उघड्या असलेल्या गटारांमध्ये पादचारी व दुचाकी चालक पडून छोटे-मोठे अपघात झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वाघजाईनगर येथील रस्त्यालगत असलेली गटारे उघडी आहेत. गटारे बुजविण्याचे वारंवार सांगून देखील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसलीच दखल घेत नाहीत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघजाईनगर मधील जागोजागी उखडलेला रस्ता दुरुस्ती करण्याच्या कामात हलगर्जीपणा दाखवत आहेत, असा आरोप नागरिक करत आहेत. डोळ्यावर कातडी ओढलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाघजाई नगर येथील रस्त्यालगत असलेली उघडी गटारे बुजवली नसल्याने नागरिकांनी संतापही व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे ठेकेदार ड्रेनेज व खोदकामाची कामे घेतात. परंतु कामे सुरू असताना सुरक्षाविषयक फलक लावत नाहीत. एखाद्याचा त्या खड्ड्यात पडून बळी गेला तरी ठेकेदाराला त्याचे काही घेणेदेणे नाही. जाणारे येणारे मरू किंवा त्यांचेे हात पाय मोडू याकडे अधिकाऱ्यांचे व ठेकेदारांचे दुर्लक्ष झाले आहे.
- कचऱ्याच्या जंजाळात अडकले विद्युत रोहित्र –
” चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खराबवाडी हद्दीतील अगदी ग्रामपंचायती नजीक असलेले विद्युत रोहित्र कचऱ्याच्या जंजाळात अडकले आहे. या ठिकाणाहून शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू असतो. येथे कचरा टाकू नका. असे फलकही त्याठिकाणी लावण्यात आले होते. हा कचरा उचलण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
” रस्त्याने येता जाता कामगार अथवा नागरिकांनी घरातून आणलेला कचरा इतरत्र कोठेही फेकून देणे चुकीचे आहे. कचऱ्यातून सुटणारी दुर्गंधी इतरांसाठी घातक असून, परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे.” – विशालभाऊ तुळवे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस,.