हायवे पेट्रोलियम सेंटरचा इंधन पुरवठा तात्काळ स्थगित

Photo of author

By Sandhya

Fuel supply to Highway Petroleum Center suspended immediately

इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे.
तेल कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडून पेट्रोल व डिझेल तुटवड्याबाबत निराधार अफवा पसरविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाइन्स (MDG) २०२४ अंतर्गत “गंभीर अनियमितता” (Major Irregularity) म्हणून गणली जाते. डीलरशिप करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत तेल विपणन कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याबाबत जनजागृती केली जात असताना, अप्रमाणित माहिती प्रसारित केल्यामुळे इतर पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

सदर पेट्रोल पंप चालकास २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास डीलरशिप रद्द करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तेल कंपनीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page