Bhigwan case shocking; Minor girl accused of torture, kidnapping and threats – four booked under POCSO

Photo of author

By Sandhya

भिगवण प्रकरण हादरवणारे; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अपहरण व धमक्यांचा आरोप — चौघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा

लग्नासाठी दबाव, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचाही गंभीर आरोप

भिगवण : येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी धमकावून वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित तरुणीचे अपहरण करण्यात आले. तिचे २२ फेब्रुवारीला लग्न ठरले होते. त्यासाठी ती आई व भावासह सोने खरेदीसाठी गेली असताना झहीर हरुण शेख, आयान हरुण शेख (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड) व त्यांच्या साथीदारांनी तिला जबरदस्तीने टेम्पोत बसवण्याचा प्रयत्न केला. विरोध करणाऱ्या आईवर दांडक्याने हल्ला करून तसेच आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर आरोपींनी पीडितेला विविध ठिकाणी नेऊन धमकावत ठेवले. ४ एप्रिल रोजी दिलेल्या जबाबात पीडितेने सांगितले की, बारामती येथील एका हॉटेलमध्ये ती अल्पवयीन असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्या घटनेचे फोटो व व्हिडिओ काढून नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे तिने नमूद केले आहे.
तसेच आरोपींनी लग्नासाठी दबाव टाकत “आम्ही स्वेच्छेने लग्न केले आहे” असे व्हिडिओमध्ये सांगण्यास भाग पाडले. स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने सह्या घेतल्या. आई व भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन बारामती पोलिसांकडे खोटा जबाब देण्यास भाग पाडल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या दरम्यान पीडितेला गोमांस खाण्यास भाग पाडणे, टिकली काढणे, मानसिक व शारीरिक छळ करणे असे गंभीर प्रकार झाल्याचेही तिने सांगितले आहे. नंतर न्यायालयाच्या आदेशाने नातेवाईकांच्या ताब्यात आल्यानंतर पीडितेने संपूर्ण घटनाक्रम उघड केला.
या प्रकरणी झहीर हरुण शेख, आयान हरुण शेख, अझर शौकत शेख (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड) आणि सद्दाम शेख (रा. बारामती) यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे १३७(२), ३०९(४), ३(५), ६४(२), ७४, ७५(२), ३५१(२) तसेच पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page