

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 8.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार
मुंबई, दि. 8 : शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल.
राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांसोबत तसेच थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून राज्य प्रशासन कोणतीही समस्या सोडवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले