Need to work by being prepared to accept the challenge of crimes in the changing times – Chief Minister Devendra Fadnavis

Photo of author

By Sandhya

बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसारख्या आव्हानांना सामोरे जात अधिक सज्जतेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कलिना येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ च्या समारोप व बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रीमंगल प्रभात लोढा, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोईर, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वाधिक व्यावसायिक आणि सक्षम दलांपैकी एक असून कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. राज्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीत पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

पोलीस दलाचे दैनंदिन कार्य अत्यंत आव्हानात्मक असून अशा क्रीडा स्पर्धांमुळे फिटनेस, कौशल्य आणि संघभावना वृद्धिंगत होते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस दल सातत्याने उज्ज्वल कामगिरी करत आहे. अत्यंत उष्ण वातावरणातही स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुंबई पोलीस व आयोजकांचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कौतुक केले. खेळामध्ये जिंकणे-हरणे यापेक्षा खेळाडूवृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचे सांगत सर्व सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धांमध्ये यजमान मुंबई संघाने पुरुष व महिला गटात उत्कृष्ट संघाचा किताब पटकावला. उपविजेत्या संघासह वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीचिन्ह देऊन अभिनंदन केले. १०० मीटर महिला स्पर्धेत पुणे शहरच्या निकिता संदीप खताळ आणि १०० मीटर पुरुष स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्राच्या चैतन्य संतोष मरडे यांनी नवे विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल विशेष कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक अपर मुख्य पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी केले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यातील विविध पोलीस परिक्षेत्रातील खेळाडूंनी दिमाखदार संचलन सादर केले. यास पोलीस बँडची सुरेल संगीत साथ होती.

Leave a Comment

You cannot copy content of this page