Submit a proposal for expansion of the cow shelter and construction of a picnic spot in Pandharpur – Revenue Minister Chandrashekhar Bawankule

Photo of author

By Sandhya

पंढरपूर येथे गोशाळा विस्तारासह पिकनिक स्पॉट उभारणीचा प्रस्ताव सादर करा -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २८ : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारित पंढरपूर नगरपालिका हद्दीतील यमाई तलाव परिसरात गोशाळा कार्यरत आहे. या गोशाळेच्या विस्तारासह त्या ठिकाणी पिकनिक स्पॉट विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले.

मंदिर समितीने गोशाळेला लागून असलेली अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यासंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रत्यक्ष तर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज ऑनलाईन उपस्थित होते.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारीतील गोशाळेत सध्या सुमारे २२५ लहान-मोठ्या गौर जातीच्या गायी आहेत. या गोशाळेतील गाईंच्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या नित्योपचार व महानैवेद्यासाठी केला जातो. गायींसाठी आवश्यक चारा, पशुखाद्य तसेच इतर सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि, विद्यमान गोशाळेसाठी जागा अपुरी पडत असल्याने गोशाळा विस्ताराची आवश्यकता निर्माण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मंदिर समितीमार्फत पंढरपूर येथील गट क्रमांक १६१ मधील ३ हेक्टर १२ आर क्षेत्राची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित क्षेत्रापैकी सध्या गोशाळेसाठी वापरात असलेल्या मोकळ्या १.२० हेक्टर क्षेत्र आरक्षणातून वगळण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी. तसेच गोशाळेचा विस्तार करताना त्या परिसरात भाविकांसाठी आकर्षक व उपयुक्त पिकनिक स्पॉट विकसित करण्याचाही समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत दिले.

Leave a Comment

You cannot copy content of this page