A farmer from Patna’s homemade ‘banana’ trap in his mango orchard will eradicate dangerous insects

Photo of author

By Sandhya

आंब्याच्या बागेत ‘केळी’चा सापळा पाटण्यातील शेतकऱ्याच्या देसी जुगाडाने घातक किडींचा होणार नायनाट

बारामती – पाटण्यातील अनुभवी शेतकरी श्री.अमरजीत कुमार सिन्हा यांनी आंबा आणि पेरूसारख्या रसाळ फळांना ‘फळमाशी’च्या घातक हल्ल्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत स्वस्त आणि प्रभावी देसी उपाय शोधला आहे.फळमाशीमुळे अनेकदा फळे आतून सडतात आणि बागायतदारांना ९० टक्क्यांपर्यंत मोठे नुकसान सहन करावे लागते.या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी पिकलेल्या केळी फळ आणि टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एक खास ‘किड सापळा’ तयार केला आहे.या सापळ्याकडे फळमाशा आकर्षित होतात आणि त्यात अडकून मरतात.आंब्याच्या बागेत फळे पक्व होण्याच्या काळात फळमाशी हा बागायतदारांचा सर्वात मोठा शत्रू ठरतो.ही छोटीशी माशी संपूर्ण पिकाचे मोठे नुकसान करू शकते. फळमाशी फळांच्या सालीला छिद्र करून आत अंडी घालते.त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळ आतून सडवतात. त्यामुळे शेतकरी अनेकदा महागडी आणि विषारी कीटकनाशके फवारतात,जी माणसांच्या आरोग्यासोबतच पर्यावरणासाठीही घातक ठरतात.बिहार मधील पाटण्यातील लोदीपूर चांदमारी येथे राहणारे ६१ वर्षीय अनुभवी शेतकरी अमरजीत कुमार सिन्हा यांनी या समस्येवर एक स्वस्त आणि परिणामकारक उपाय शोधून काढला आहे.त्यांच्या ३० वर्षांच्या अनुभवातून विकसित झालेली ही पद्धत फळमाशीपासून संरक्षण देऊन रासायनिक औषधांचा वापर कमी करते आणि आंब्याची गोडी टिकवून ठेवते.
टाकाऊ बाटल्या आणि पिकलेल्या केळ्यांपासून तयार होतो सापळा
या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची साधी पद्धत यासाठी कोणतेही विशेष कौशल्य किंवा महागडी यंत्रसामग्री लागत नाही.टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या मधून कापून त्यामध्ये पिकलेल्या केळ्यांचा चारा ठेवला जातो.त्यात लॅमडा सायहॅलोथ्रीन/ मोनोक्रोटोफॉस औषधाचे काही थेंब मिसळले जातात.पिकलेल्या केळीचा सुगंध फळमाशांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो.जसे माशा त्या सापळ्यात येतात,त्या काही तासांत नष्ट होतात.हा सापळा झाडावर टांगताच काम सुरू करतो आणि एकदा तयार केलेला ट्रॅप मधीलचारा सुमारे १५ दिवस प्रभावी राहतो.
कमी खर्चात फळमाशीपासून संरक्षण
शेतीत नफा वाढवण्यासाठी खर्च कमी असणे महत्त्वाचे असते. अमरजीत यांचा हा ‘बनाना ट्रॅप’ त्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड ट्रॅपसाठी प्रति हेक्टर सुमारे २००० रुपये खर्च येतो, तर या देशी पद्धतीने फक्त १०० ते १५० रुपयांत काम होते.एका एकर बागेसाठी फक्त २५ ते ३० ट्रॅप पुरेसे असतात.एका ट्रॅपची किंमत केवळ ३ ते ४ रुपये येते आणि तो ४ ते ५ झाडांसाठी उपयोगी ठरतो.या छोट्याशा गुंतवणुकीमुळे फळमाशीचा प्रादुर्भाव ९० टक्क्यांपर्यंत कमी होतो.त्यामुळे फळांची गुणवत्ता आणि चमक टिकून राहते आणि शेतकऱ्यांना बाजारात चांगला दर मिळतो.
आरोग्य आणि पर्यावरणासाठीही फायदेशीर
या नवकल्पनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण सामान्यतः शेतकरी संपूर्ण झाडावर कीटकनाशकांची फवारणी करतात, ज्याचा परिणाम थेट फळांवर होतो. पण या सापळा पद्धतीत विषारी औषधांचा वापर अतिशय मर्यादित प्रमाणात आणि फक्त बाटलीच्या आत केला जातो.ही पर्यावरणपूरक पद्धत फायदेशीर कीटकांना नुकसान न पोहोचवता फक्त फळमाशीवर नियंत्रण ठेवते. ही पद्धत एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) चे उत्तम उदाहरण असून भविष्यातील शाश्वत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.
विषमुक्त फळे आणि भाज्यांसाठी उपयुक्त उपाय
अमरजीत कुमार सिन्हा यांच्या या यशामुळे बागायतदार आणि भाजीपाला उत्पादकांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे. आंबा आणि पेरूमध्ये यशस्वी ठरलेल्या या पद्धतीचा वापर आता जांभूळ सारख्या नाजूक फळांवर तसेच काकडी,भोपळा,दुधी भोपळा यांसारख्या वेलवर्गीय भाज्यांवरही करून पाहण्याची गरज आहे.जर या तंत्रज्ञानाला सरकारी स्तरावर प्रोत्साहन मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला,तर ते शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच देशात कीटकनाशकमुक्त फळ उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.अमरजीत यांचा हा शोध कमी साधनांमध्येही मोठे यश मिळवता येते याचे उत्तम उदाहरण आहे.
संतोष गोडसे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती

Leave a Comment

You cannot copy content of this page