
पोटच्या मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बापास जन्मठेप – जुन्नर न्यायालयाचा निर्णय
जुन्नर : ओतूर (ता.जुन्नर) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ डिसेंबर २०२० रोजी ९ वर्षाची मुलगी शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवण करण्यासाठी घरी आली असता घरात कोणी नसल्याची संधी साधुन तीच्या वडीलांनी घराचा दरवाजा आतून बंद केला व स्वतःच्याच अल्पवयीन मुलीस हाताने मारहाण करून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला सदर घटनेची माहिती मुलीच्या आईला समजल्यावर दि.१९ डिसेंबर २०२० रोजी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवर ओतूर पोलीस स्टेशनला मुलीच्या नराधम बापावर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पी.एच.कांबळे यांनी गुन्हयाचा तपास स्वतःकडे घेवुन आरोपीस अटक केली. व आरोपीचे विरोधात सबळ पुरावे प्राप्त करून तपासी अधिकारी यांनी परिपुर्ण दोषारोपपत्र मा.न्यायालयात दाखल केले होते.
गुन्हयाचे दोषारोपत्र दाखल केल्यानंतर सदरच्या गुन्हयाची सुनावणी विशेष न्यायाधिश, अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नरचे एस.बी. शेलार यांच्यासमोर झाली असून आरोपीचे विरोधात सबळ पुरावे आढळुन आल्याने मा.न्यायालयाने आरोपी राजेश रामदास नवले यास फौजदारी प्रकीया संहीताच्या कलम २३५ (२) नुसार लैंगीक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनीयम ४ (२) अंतर्गत शिक्षा पात्र गुन्हयासाठी दोषी ठरवून, आरोपी राजेश नवले यास लैंगीक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ४ अन्वये जन्मठेपेची सक्त शिक्षा आणि १०,००० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दंड न भरल्यास ६ महीने तुरूंगवास भोगावा लागेल त्याचप्रमाणे भादवि क. ३२३ अन्वये शिक्षापात्र गुन्हयासाठी १ वर्षाच्या सक्त कारावासाची आणि १,००० रू. दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास ३ महिन्याची शिक्षा भोगावी लागेल अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे.
संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीणचे रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक बारामतीचे गणेश बिरादार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, कोर्ट पैरवी अधिकारी म.पो.हवा. मनिषा ताम्हाणे, महीला कर्मचारी पुजा औटी यांनी काम केले असुन सदरच्या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे तसेच पो.हवा. देविदास खेडकर यांनी केला आहे.त्याचप्रमाणे अतीरिक्त सरकारी वकील म्हणुन जी.के. खोडे यांनी काम पाहीले आहे.