The groundbreaking ceremony for the renovation of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial was held with enthusiasm.

Photo of author

By Sandhya

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी (दि. १४ मे) धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त उत्साहात पार पडला. या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी भूमिपूजन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने सकाळी शंभूराजांचा जन्मोत्सव सोहळा आणि पाळणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच पुण्यातील इतिहास संशोधक आणि नित्यपूजा करणाऱ्या विविध संस्थांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून येत्या एका वर्षात या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.”

प्रतिष्ठानचे संस्थापक व माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “या स्मारकाच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, चरित्र आणि विचार अधिक व्यापक पातळीवर समाजापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

या कार्यक्रमाला माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, तसेच नगरसेवक राघवेंद्र मानकर, अपूर्व खाडे, अमृता म्हेत्रे, सुनिल पांडे, निवेदिता एकबोटे, अल्पना वरपे, पृथ्वीराज सुतार, विशाल धनावडे, धीरज घाटे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, नारायण गलांडे, तेजश्री पवळे यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पदाधिकारी, उपायुक्त, स्थानिक नागरिक आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page