







बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात दिनांक 31 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान
बारामती – काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक, थोपटेवाडी, मासाळवाडी, होळ, सदोबाची वाडी, सस्तेवाडी इत्यादी गावांमध्ये केळी, डाळिंब, पेरू, वांगी, आंबा, कोथिंबीर, ऊस व चारा पिके यांचे मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झाले. त्या संदर्भाने आज कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे तज्ञ, कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी यांनी सदर गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच शासनामार्फत पंचनामाचे काम अधिकाऱ्यांमार्फत चालू केले.
वडगाव निंबाळकर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. अभिषेक अनिल कुमार शहा यांची 10 एकर वरील केळीची बाग गारपीट व वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. युद्धामुळे मागील दोन महिने केळीचे दर 2 रुपये किलो झाले होते ते आता कोठे 34 रुपयापर्यंत गेले असतानाच निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला तसेच 6 एकरावरील पेरूच्या बागेस देखील याचा तडाखा बसला असून फळांचे नुकसान झाले आहे सध्या लाल पेरू 150 रु प्रतिकिलो दर मिळत आहे त्याची क्वालिटी कमी झाल्याने त्यास व्यापारी घेणार नाही .
सस्तेवाडी येथील श्री. नितीन कदम यांचे एक एकरावरील ढोबळी मिरचीचे शेडनेट गारा व जोराच्या वाऱ्याने संपूर्णपणे कोलमडले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचा पहिला तोडा ६० रुपयाने गेला होता व त्यांना 40 टनापर्यंत उत्पादन अपेक्षित असताना सर्व नुकसान झाले. त्यांनी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमानात उत्कृष्ट पीक आणले होते मात्र ते आता मातीमोल झाले आहे. याच गावातील किशोर कदम यांची अर्ध्या एकर वरील काकडी आणि एक एकरवरील कोथिंबीर याचे देखील पूर्ण नुकसान झाले आहे.
सदोबाची वाडी येथील श्री. ऋषिकेश धुमाळ यांचे सव्वा एकर वरील अगोरा वांगी याचे पूर्ण पाने, फुले, फळे गळून गेली आहेत. या सर्व गावातील ऊस पिकाची पाने व इतर सर्व पिकांना या पावसाने व गारांच्या माऱ्याने शॉक बसला आहे.
कृषी विज्ञान केंद्र मार्फत श्री. संतोष गोडसे, महसूल विभाग मार्फत सर्कल अधिकारी श्री. गजानन पारवे, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी श्री. हाके साहेब, वडगावचे ग्रामविकास अधिकारी श्री. किरण राधवे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. मिथुन बोराटे, केव्हीके चे श्री. प्राफुल्ल पोट, श्री. विजय मदने पंचायत समिती सदस्य श्री. जितेंद्र पवार, वडगावचे सरपंच श्री. सुनील ढोले उपस्थित होते.
उपायोजना –
- शेतातील साठलेल्या पाण्याचा निचरा करावा.
- उताराला समांतर चारी काढाव्यात व जमिनीत पाणी साठून राहिलेले असल्यास ते चर काढून निचरा करावे
- फळबागेतील नुकसानीची पातळी कमी करण्यासाठी पेरू, सिताफळ, आंबा बागेतील मोडलेल्या फांद्या छाटणी करून घ्याव्यात व छाटलेल्या भागावर १% बोर्डो पेस्ट लावावी.
- खराब झालेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओलावा जास्त प्रमाणात राहत असेल त्यांनी शेतामध्ये ट्रायकोडर्मा 4 किलो + सुडोमोनस 4 किलो प्रति एकर द्यावे जेणेकरून जमिनीतून उद्भवणाऱ्या मर रोगाचे नियंत्रण करता येईल.
- नुकसानग्रस्त पीक भागावर कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करून घ्यावे.
- फवारणीसाठी कार्बेन्डेझिम बुरशीनाशक 1 ग्रॅम + इमिडाक्लोबप्रीड 17.8% SL कीटकनाशक 0.4 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे पिकावर सकाळच्या वेळेस फवारणी करावी.
- साधारण आठ ते दहा महिने वय असलेल्या ऊसाला शक्य असेल तिथे पाचटीने बेटे बांधणी करावीत जेणेकरून हवा खेळती राहील व जमिनीत वाफसा राहील.
- याशिवाय ड्रिप मधून मुळांच्या वाढी व संख्या वाढण्यासाठी ह्युमिक ऍसिड 1 किलो + 12: 61: 00 प्रति एकर ड्रिपमधून 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा द्यावे.
- पिक कालावधी संपलेल्या प्लॉटची स्वच्छता करून घ्यावी, वाफसा पाहून मशागत करावी व खरीप हंगाम लागवडीसाठी क्षेत्र तयार करून ठेवावे. सध्याच्या उपलब्ध हवामान अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
सगळ्यात महत्वाचे – आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित झालेल्या नुकसानाची माहिती, फोटो काढून विमा अधिकाऱ्यास, कृषी विभागास कळविणे महत्वाचे आहे.