
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा;
मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश
बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून काही झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी विशेषतः मुळासकट उन्मळून पडलेल्या मोठ्या वृक्षांचे संवर्धन करण्यावर भर देत, अशा झाडांचे मोठ्या क्रेनच्या सहाय्याने स्थलांतर करून आवश्यक ती छाटणी केल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यास सांगितले. तसेच आगामी काळात वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता रस्त्यालगतच्या मोठ्या वृक्षांची आवश्यक ती छाटणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील तसेच तालुक्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत तहसीलदारांनाही त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या बारामतीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून, नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.