Increasing crime in Patas area; Shooting in the main square, atmosphere of fear among citizens after the incident!

Photo of author

By Sandhya

पाटस परिसरातील वाढती गुन्हेगारी; मुख्य चौकात गोळीबार, घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

पाटस, ता. दौंड : शुक्रवार (दि. ५ जून) रोजी दुपारच्या सुमारास पाटस परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काही तरुणांनी जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून पाटस येथे मुख्य चौकात हवेत तीन व एका चारचाकी वाहनावर गोळीबार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या पाटस गावात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. व्यवसायिकदृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटसमध्ये अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असून, काही सराईत गुन्हेगारांकडून उद्योग व व्यावसायिकांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी वेळोवेळी पुढे येत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, पाटस पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदाचा अधिकारी नसल्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी स्वतंत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन आरोपी पोलिसांनी अटक केली असून, बाकीच्या आरोपीचा शोध चालू आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page