Shikrapur police efforts to curb the theft of mobile phones and jewelry at the weekly markets of Shikrapur, Koregaon, and Talegaon.

Photo of author

By Sandhya

शिक्रापूर,कोरेगाव,तळेगाव आठवडे बाजारात मोबाईल दागिने चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी शिक्रापूर पोलिसांचे प्रयत्न..

बाजारात लाऊडस्पीकर वरून सूचना आणि पेट्रोलिंग…..

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्क पेट्रोलिंगमुळे दोन महिला रंगेहाथ जेरबंद

शिक्रापूरच्या गजबजलेल्या आठवडे बाजारात बाजारकरूंच्या खिशातील मोबाईल आणि लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे नियंत्रणात आला. विशेष पेट्रोलिंग आणि जनजागृती मोहिमेचा थेट परिणाम म्हणून दोन संशयित महिलांना पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर,कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारात हजारो नागरिक,शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि दागिने लंपास करण्याच्या घटना होत असतात.ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही बाजारात मोबाईल आणि पर्स कसे सांभाळावे याबाबत सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकर लावण्यात आले.विशेष पेट्रोलिंग पथके आणि वाहतूक नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत.
बाजार परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतत सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.महिलांनी दागिने आणि पर्सची काळजी घ्यावी, तर पुरुषांनी मोबाईल फोन शर्टच्या वरच्या खिशात ठेवू नये,अशा सूचना सातत्याने दिल्या जात आहेत.
दरम्यान,बाजारात गस्त घालत असताना शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे,महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी वाघोले,पोलीस हवालदार अमोल दांडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके यांच्या पथकाच्या निदर्शनास दोन महिला संशयास्पद हालचाली करताना आल्या.पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले असता त्या एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरण्याच्या प्रयत्नात असल्याचे उघड झाले.
तत्काळ कारवाई करत पोलिसांनी सारिका राजू जाधव (वय ४२, रा. मंतरवाडी,हडपसर,पुणे) आणि साक्षी मेघराज पवार (वय ३०, रा. मंतरवाडी,हडपसर,पुणे) यांना ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान त्या शिक्रापूर बाजारात नेमक्या कोणत्या कारणासाठी आल्या याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत.पुढील तपासात त्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल आणि महिला,लहान मुलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने बाजारात आल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर करीत आहेत.

‘आठवडे बाजारात विशेष पेट्रोलिंग, वाहतूक नियोजन आणि जनजागृती मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.बाजारात आपला मोबाईल आणि पर्स सांभाळा.संशयास्पद हालचाल आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
-चंद्रशेखर यादव

ही मोहीम पोलीस अधीक्षक संदीप सिंह के,अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख,सोमनाथ कचरे,पोलीस अंमलदार श्रावण गुपचे,अमोल दांडगे,पंडित मांजरे,संदीप इथापे,अमोल चव्हाण यांनी राबविली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page