
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठातर्फे डॉ. राजेंद्र सिंह यांच्या पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ या हिंदी आणि मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
पुणे, दि.२ जुलै: एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या वतीने डॉ. राजेंद्र सिंह लिखित पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रेक्षागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न होत असून, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे आणि विशेष अतिथी म्हणून राज्यसभा सदस्या मा. डॉ. मेधाताई कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी पुस्तकाच्या हिंदी आणि रिटा रॉड्रिग्स यांनी अनुवादित केलेल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात येणार असून, यासाठी डॉ. राजेंद्र सिंह यांच्यासहित एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. डॉ. गोपालकृष्ण जोशी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उद्योगविश्वातील, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील तसेच जलसंवर्धन आणि पर्यावरण तज्ञ उपस्थित असणार आहेत. अशी माहिती पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषेदेला संबोधित करताना एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांनी दिली. यावेळी संचालक राघवेंद्र एम. चाटे संचालक (स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स) आणि प्रा. प्रभा कासलीवाल प्रोजेक्ट डायरेक्टर एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ उपस्थित होत्या.
शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य माईर्स एमआयटी शिक्षण समूह गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबच पर्यावरण संवर्धन, विश्वशांती आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटांचे बांधकाम व सुशोभीकरण, नदी स्वच्छता आणि परिसर विकास, उत्तराखंडमधील माना गाव येथे सरस्वती नदीच्या उगमस्थानी देवी सरस्वती मंदिराचा विकास, तसेच विविध तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत एमआयटी समूहाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपक्रमांमुळे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला गेला नाही, तर पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक विकासालाही चालना मिळाली आहे. “विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून मानवकल्याण” हा विचार संस्थेच्या प्रत्येक उपक्रमातून प्रतिबिंबित होतो. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जागरूकता, सामाजिक उत्तरदायित्व आणि शाश्वत जीवनशैलीची मूल्ये रुजविण्यासाठी माईर्स एमआयटीमध्ये सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात.
याच परंपरेचा वारसा पुढे नेत सोलापूर येथील एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाने कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकासाला विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सामाजिक ध्येयाचा केंद्रबिंदू बनविले आहे. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाने Sustainability, Environmental Responsibility आणि Community Engagement (शाश्वतता, पर्यावरणीय जबाबदारी, सामाजिक सहभाग, जलसंवर्धन, ग्रामीण विकास) या संकल्पनांना अभ्यासक्रम, संशोधन आणि समाजाभिमुख उपक्रमांशी जोडले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर न बनविता संवेदनशील, जबाबदार आणि पर्यावरण-जागरूक नागरिक घडविण्याचे कार्य विद्यापीठ करत आहे.
पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषेदेला संबोधित करताना
भारतातील प्रख्यात जलसंवर्धन तज्ज्ञ, ‘वॉटरमॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार तसेच स्टॉकहोम वॉटर प्राईजने सन्मानित डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थानसह देशातील विविध भागांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून नद्या आणि जलस्रोतांचे पुनर्जीवन घडवून आणले आहे. त्यांच्या कार्याने जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात नवे आदर्श निर्माण केले आहेत. पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ या हिंदी व मराठी पुस्तकाचे प्रकाशनाचा उद्देश डॉ. राजेंद्र सिंह यांच्या नदी पुनर्जीवनाच्या प्रेरणादायी कार्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच जलसंवर्धन, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. “नदी पुनर्जीवन, जलसंवर्धन आणि लोकसहभागातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे हे पुस्तक समाजाला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल” असा विश्वास एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांनी व्यक्त केला आहे.
– जनसंपर्क विभाग
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ