Seven-year tenure successful thanks to the cooperation of Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Eknath Shinde; Dr. Neelam Gorhe congratulated Sachin Ahir on his election as Deputy Chairman of the Legislative Council.

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे सात वर्षांचा कार्यकाळ यशस्वी; विधानपरिषद उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल सचिन अहिर यांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आमदार सचिन अहिर यांची एकमताने निवड झाल्यानंतर शिवसेना नेत्या व मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात मनोगत व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. अहिर यांचा दीर्घ संसदीय अनुभव, मंत्री म्हणून केलेले काम, संघटनात्मक नेतृत्व आणि सर्व पक्षांशी जपलेले सौहार्द यामुळे ते उपसभापतीपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

डॉ. गोऱ्हे यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष, सातत्याने निवडून आलेले आमदार व मंत्री म्हणून देखील कार्य केले असल्याची आठवण करून दिली. सभागृहातील चर्चांमध्ये अभ्यासपूर्ण उत्तरे देणे, विरोधकांचेही म्हणणे संयमाने ऐकून घेणे आणि सर्व सदस्यांना समान सन्मानाने वागविणे, ही त्यांची कार्यशैली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शिवसेनेत प्रवेशानंतरही पुण्याचे संपर्कप्रमुख म्हणून सचिन अहिर यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे भूमिका मांडली असून संघटनात्मक जबाबदाऱ्याही यशस्वीरीत्या पार पाडल्या, असे गौरवोद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले.

उपसभापतीपदाच्या गौरवशाली परंपरेचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. रामचंद्र गणेश सोमण, व्ही जी लिमये, श्रीमती जे टी सिपहिमलानी, रा सु गवई, वसंतराव डावखरे आदी मान्यवरांनी या पदाची प्रतिष्ठा वाढविल्याचे सांगत, त्या परंपरेला सचिन अहिर न्याय देतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

आपल्या सात वर्षांच्या उपसभापतीपदाच्या कार्यकाळाचा आढावा घेताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपसभापतीपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर २०२६ पर्यंत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी कायम ठेवली. या काळात कोविड-१९ महामारीसारख्या अभूतपूर्व परिस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविणे, महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चा हाताळणे तसेच तब्बल दीड वर्षे सभापती आणि उपसभापती या दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यकाळात अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तडफदार , आश्वासक भुमिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण सहकार्य व पाठबळ लाभल्यामुळे प्रत्येक आव्हानाला समर्थपणे सामोरे जाता आले, असे त्यांनी सांगितले. पेशाने विधिज्ञ असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचे कायदेशीर मार्गदर्शन तसेच विधिमंडळ सचिवालयातील अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळालेले संसदीय मार्गदर्शन यामुळे पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभागृहाच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंच्या सदस्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील किंवा विरोधी बाकावरील कोणत्याही सदस्याचा वैयक्तिक अवमान होत असल्याचे दिसल्यास तो कधीही खपवून घेतला नाही. अशा प्रसंगी आवश्यक असल्यास सभागृहाचे कामकाज थांबवून संबंधित सदस्यांना कार्यालयात बोलावून शांततेत चर्चा करून तोडगा काढण्याची भूमिका कायम ठेवली. संसदीय परंपरा, सभागृहाची प्रतिष्ठा आणि सदस्यांचा परस्पर सन्मान यांना सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पडत राहिले, असेही त्यांनी नमूद केले.

सभागृहाचे कामकाज अधिक परिणामकारक होण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दोन्ही सभागृहांतील पीठासीन अधिकारी, गटनेते आणि पक्षप्रतिनिधी यांच्या नियमित बैठका झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. सदस्यांना महत्त्वाच्या कार्यक्रमांची माहिती वेळेत मिळावी, यासाठी अधिक प्रभावी सूचना व्यवस्था विकसित करण्याची सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.

सभागृहातील महिलांना बोलण्याची संधी प्राधान्याने देण्याच्या आपल्या कार्यपद्धतीचाही डॉ. गोऱ्हे यांनी उल्लेख केला. अल्प वेळ मागणाऱ्या सदस्यांना प्रथम संधी दिल्याने सभागृहातील अस्वस्थता कमी होत असल्याचा अनुभवही डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.

भाषणाच्या शेवटी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उपसभापतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर कोणतीही खंत किंवा नाराजी न ठेवता त्या ही जबाबदारी सचिन अहिर यांच्याकडे आनंदाने सोपवत आहेत. सभागृहाच्या एकमताने झालेल्या या निवडीचे डॉ. गोऱ्हे यांनी मनापासून स्वागत केले व सचिन अहिर यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. संसदीय परंपरा, संवाद आणि सर्वपक्षीय सहकार्य यांचा आदर्श कायम राखत ते हे पद अधिक गौरवशाली करतील, असा विश्वासही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page