



अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ₹११.४० कोटींच्या खर्चातून बारामती रेल्वे स्थानकाचा आधुनिक, प्रवासी-स्नेही आणि जागतिक दर्जाच्या सुविधांनी युक्त असा कायापालट करण्यात आला असून हे अद्ययावत स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे.
बारामतीच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आदरणीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्यानं पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचं योगदान दिलं.त्याचबरोबर माझ्या खासदारकीच्या कालावधीतही या प्रकल्पासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला.या संयुक्त प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहे.या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी आणि रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार मानते.
१९१४ पासूनचा इतिहास असलेल्या या स्थानकाचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता झालेलं हे अत्याधुनिक आधुनिकीकरण बारामतीच्या विकासाला नवी गती देणारं ठरेल.दररोज सुमारे १,८०० प्रवाशांची सेवा देणाऱ्या या स्थानकावर आधुनिक प्रतीक्षा कक्ष, व्हीआयपी लाउंज,दिव्यांग-अनुकूल सुविधा,सुधारित प्लॅटफॉर्म, आधुनिक प्रकाशयोजना,पिण्याच्या पाण्याच्या सुविधा,नव्यानं विकसित पार्किंग,आकर्षक प्रवेशद्वार आणि स्थानिक संस्कृतीची झलक जपणारी स्थापत्य रचना अशा अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बारामती हे राज्यातील महत्त्वाचं कृषी,शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यामुळं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळं स्थानिक व्यापार, उद्योग,दळणवळण आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल.भिगवण पक्षी अभयारण्य,श्री सिद्धेश्वर मंदिर, बारामती कृषी पर्यटन केंद्र आणि कऱ्हा नदी परिसर यांसारख्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोच अधिक सुलभ होणार आहे.
स्थानकाच्या पुनर्विकासामध्ये मुख्य स्थानक इमारतीचं सौंदर्यीकरण, परिसर विकास,प्रवेशद्वार व कंपाऊंड भिंतींचं आधुनिकीकरण,स्वच्छता सुविधांचा विस्तार, प्रमाणित नामफलक,प्रवाशांच्या सुरळीत हालचालींसाठी सुधारित व्यवस्था तसंच स्थानकापर्यंत सहज पोहोचता यावं यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. मुख्य रस्ते आणि राज्य महामार्गांशी असलेली सुलभ जोडणी,तसंच ऑटो-रिक्षा व इतर स्थानिक वाहतूक सेवांमुळं प्रवाशांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतचा प्रवासही अधिक सोयीचा होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत साकारलेलं हे आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रवासी-स्नेही रेल्वे स्थानक बारामतीच्या आर्थिक,कृषी, औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीला अधिक बळ देणारं ठरेल, तसंच सुरक्षित,सुलभ आणि दर्जेदार रेल्वे प्रवासाचा नवा अनुभव नागरिकांना देईल,असा विश्वास आहे.