
पायधुनी परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सुरक्षारक्षकाने केलेला अमानुष अत्याचार अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारा असून, या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी शिवसेना नेत्या व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच तपास जलदगतीने पूर्ण करून सक्षम दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
डॉ. गोऱ्हे यांच्या प्रतिनिधींनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी मुलीचे वडील आणि शेजाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. नसरापूर येथील घटनेप्रमाणेच या प्रकरणातही पीडितेला तातडीने न्याय मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील राहील आणि त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली.
यावेळी पीडित कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडूनही तातडीने न्याय आणि ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. ते शिवसेनेचे कार्यकर्ते असून त्यांनी विशेष विनंती करत आरोपी ज्या खासगी कंपनीमार्फत सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आला, त्या कंपनीची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी या मागणीला पाठिंबा देत संबंधित सुरक्षारक्षकाची पार्श्वभूमी, चारित्र्य पडताळणी व नियुक्ती प्रक्रिया यांची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
या प्रकरणाच्या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पीडित मुलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेचा तातडीने लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रकरणाचा प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती, पीडित मुलीचे व तिच्या कुटुंबीयांचे तातडीने मानसिक समुपदेशन (कौन्सेलिंग) सुरू करणे, तसेच तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी सूचना दिले.
डॉ. गोऱ्हे यांनी केलेल्या सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येईल, तसेच मनोधैर्य योजनेचा लाभ, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती आणि समुपदेशनाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले.
पीडित मुलीला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती लवकर बरी व्हावी, तिचे शिक्षण खंडित होऊ नये आणि कुटुंबाला आवश्यक ती सर्व शासकीय मदत मिळावी यासाठी शिवसेना व स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई, जलदगती न्यायालयात खटला चालविणे, पीडितेला सर्व शासकीय मदत उपलब्ध करून देणे तसेच सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या संबंधित कंपनीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.