

धायरी व प्रभाग क्रमांक ३३ मधील पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर व मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) नंदकिशोर जगताप यांनी आज धायरी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील गटनेते व नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांनी या प्रश्नाबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत ही पाहणी करण्यात आली.
धायरीसह समाविष्ट गावात प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसानंतर पाणीपुरवठ्याच्या स्रोतांमध्ये गढूळ व दूषित पाणी मिसळत असल्याने हजारो नागरिकांना अस्वच्छ व अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यासोबतच सभागृहातही हा प्रश्न उपस्थित केला होता.
आज झालेल्या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी बारंगणी मळा येथील विहीर, परिसरातील पाणीपुरवठा टाक्या तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी काकासाहेब चव्हाण यांनी धायरीकरांना वर्षभर पुरेसे, शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विविध पर्यायी उपाययोजना अतिरिक्त आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत व्यंकटेश सेरेनिटी येथे उभारण्यात आलेल्या टाकीची झालेली दुरवस्था निदर्शनास आणून देत तेथे तातडीने दुरुस्ती व आवश्यक कामे करण्याची मागणी केली.
याशिवाय धायरी परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता भविष्यातील पाणीगरज पूर्ण करण्यासाठी नवीन जलसाठा व्यवस्था, पाणी साठवण क्षमता वाढविणे, पाणीपुरवठा यंत्रणेचे सक्षमीकरण तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे काकासाहेब चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
यावर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व बाबींची सविस्तर तपासणी करून नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच दीर्घकालीन उपाययोजनांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणीदरम्यान नगरसेविका अनिता इंगळे, नगरसेविका धनश्री कोल्हे, नगरसेवक सुभाष नाणेकर, संदीप चव्हाण, दशरथ मणेरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागांचे अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.