पंढरपूर-मंगळवेढ्यातील वीजप्रश्न तातडीने मार्गी लावावेराज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश· पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांवर बैठक

Photo of author

By Sandhya

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित वीजप्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीत दिले. मंगळवेढा येथे महावितरणचे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करणे, तसेच महापारेषणच्या सोलापूर विभागाचे विभाजन करून पंढरपूर येथे नवीन विभागीय कार्यालय उभारण्याबाबत प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मतदारसंघातील नागरिक आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. मंगळवेढा परिसरातील आवताडे सूतगिरणीसह इतर औद्योगिक व कृषी ग्राहकांना गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार वीज खंडित होणे आणि विजेच्या दाबात चढ-उतार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात किमान ८ तास अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, तसेच मतदारसंघात सुरू असलेली सब स्टेशनची अनेक कामे सध्या अर्धवट अवस्थेत असून, ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

मंगळवेढा येथे स्वतंत्र महावितरण विभागीय कार्यालय तसेच पंढरपूर येथे महापारेषणचे नवे विभागीय कार्यालय स्थापन झाल्यास स्थानिक पातळीवरच वीजविषयक तक्रारींचे जलद निराकरण होऊन नागरिक व उद्योजकांचा मुंबई-सोलापूरपर्यंतचा हेलपाटा वाचणार आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होईल, असा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

या बैठकीस ऊर्जा विभागाचे सहसचिव सूर्यकांत निकम, मुख्य अभियंता (ट्रान्स, मुंबई) श्रीमती शिल्पा कुंभार, संचालक (परिचालन) सतीश चव्हाण, अधीक्षक अभियंता (सोलापूर) प्रांजल कांबळे, अधीक्षक अभियंता (धुळे) एस.एस. दराडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता (वितरण, मुख्य कार्यालय) नितीन काळे, अधीक्षक अभियंता (सोलापूर) सुनील एम. माने, मुख्य अभियंता प्रवीणसिंह पारदेशी, कार्यकारी अभियंता (पंढरपूर) मधुकर साळवे, कार्यकारी अभियंता (वितरण) अविनाश पगारे आणि आवताडे स्पिनिंग मिल्सचे युनिट हेड सुनील कामटे यांच्यासह महावितरण, महापारेषण, ऊर्जा विभाग व संबंधित आस्थापनेचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page