आयुष्मान भारत कार्ड मोहिमस्तरावर उपलब्ध करुन द्यावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध विषयांचा आढावा

प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्याकरिता आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने ग्राम विकास, महसूल व आरोग्य विभागाने मोहिम स्वरुपात कार्यवाही करावी, केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी; आरोग्य सुविधेपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, समन्यवक उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, आयुष्मान भारत कार्डद्वारे पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. याबाबतची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचावी व या संधीचा लाभ नागरिकांना व्हावे यादृष्टीने राज्य व केद्र शासन प्रयत्नशील आहे. याकरिता कार्डच्या अनुषंगाने नागरिकांची नोंदणी, वितरण करण्याची कार्यवाही करावी. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या निकषाप्रमाणे रुग्णालये संल्गन करण्याची कार्यवाही करावी. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकरिता रुग्ण कल्याण समितीला सोबत घेवून काम करावे. आरोग्य योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्याकरिता आशा कार्यकर्त्या महत्वाची भुमिका बजावतात, त्यांना वेळेत भत्ते देण्यात यावे.

जिल्ह्याला दिलेल्या निकषाप्रमाणे ग्रामीण भागातील गरोदर महिलांची प्रसुती शासकीय आरोग्य केंद्रामध्ये होईल, त्यादृष्टीने त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. पात्र बालकांचे तसेच पात्र मुलींचे 100 टक्के एचपीव्हीसी लसीकरण करावे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे क्षयरोगमुक्त ग्राम करण्यावर भर दिला पाहिजे.

पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. कुष्ठरोग, काविळ, क्षयरोग, मलेरिया, सिकलसेल आदी आजारांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा. याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.

श्री. पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे नियोजनबद्ध कार्यवाही करुन पात्र मुलींचे एचपीव्हीसी लसीकरण करुन घ्यावे. याबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. पावसाळ्यातील उद्भवणारे कीटकजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सर्व संबंधितांनी कार्यवाही करावी. आशा कार्यकर्त्यांची रिक्त पदे लवकरात लवकर नियुक्ती करावी. आरोग्य विषयांबाबत सुरु असलेल्या कामाकाजाबाबत वारंवार आढावा घेवून प्रलंबित विषय मार्गी लावावेत, असेही श्री. पाटील म्हणाले.

डॉ. देवमाने आणि डॉ. हंकारे यांनी बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, येत्या काळात आरोग्य विभागाच्यावतीने अधिकाधिक चांगले काम करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page