पुणे शहराच्या विकासासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा साठी महापौर मंजुषा नागपुरे यांची पाटबंधारे मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रही मागणी

Photo of author

By Sandhya

पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी राज्याचे पाटबंधारे (जलसंपदा) मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पुणे शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वाच्या आणि दीर्घकालीन विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी निवेदन सादर करून प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याची आग्रही मागणी केली.

बैठकीत पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील पाणी नियोजन, वाहतूक कोंडी, नदी संवर्धन आणि धरणांतील जलसाठा क्षमता वाढविण्याच्या
तसेच अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याकरता या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • धायरी परिसरातील वाहतूक कोंडीमुक्तीसाठी दोन नवीन पुलांच्या बांधकामास जलसंपदा विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) तातडीने मंजूर करावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
  • पुणे शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त २५ टीएमसी पाणीकोटा मंजूर करावा, जेणेकरून पुढील अनेक दशकांसाठी पुणेकरांची पाणी सुरक्षितता सुनिश्चित होईल.
  • मुळा-मुठा नदीच्या सर्वांगीण संवर्धनासाठी राज्यस्तरीय “मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन मिशन” स्थापन करून नदीतील गाळ काढणे, प्रदूषण नियंत्रण आणि पूर व्यवस्थापनासाठी एकात्मिक आराखडा राबविण्यात यावा.
  • खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांतील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन जलसाठा क्षमता पुनर्संचयित करावी तसेच यासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करावी.

यावेळी पाटबंधारे मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांनी मांडलेल्या सर्व मागण्या सकारात्मकरीत्या ऐकून घेतल्या असून संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.

याबाबत बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “पुणेकरांना शाश्वत पाणीपुरवठा, कोंडीमुक्त रस्ते, सुरक्षित जलस्रोत आणि स्वच्छ मुळा-मुठा नदी मिळणे ही काळाची गरज आहे. पुणे शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तातडीने निर्णय होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.”

Leave a Comment

You cannot copy content of this page