
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सासवड नगरपरिषदेच्या वतीने शहर परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधीलकी जपण्यासोबतच शहराचा ऐतिहासिक वडाचा वारसा जपणे आणि पर्यावरण समतोल राखणे, हा यामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात चंदन टेकडी ते बोरावके मळा या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वडाच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या उपक्रमाची सुरुवात नगराध्यक्षा आनंदीकाकी चंदूकाका जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप म्हणाल्या की, “आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून व शाहिरीतून समाजाला जगण्याची नवी दिशा दिली. त्यांच्या विचारसरणीचा वारसा पुढे चालवताना निसर्गाचे रक्षण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” सासवड नगरपरिषद शहरातील हिरवाई वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले, तर शहरातील नागरिकांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, नगरसेवक प्रदीप राऊत, सोपान रणपिसे, स्मिता उमेश जगताप, लिना वढणे, स्मिता सुहास जगताप, अर्चना चंद्रशेखर जगताप, कार्यालय अधीक्षक ओंकार शिंदे, नगर अभियंता सारिका कुंभार, सहायक नगररचनाकार निखिल कांचन, शहर समन्वयक राम कारंडे, संजय (मंत्री) जगताप यांच्यासह पदाधिकारी, नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.