


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्यावतीने १५ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित विशेष आरोग्य तपासणी शिबिरात २ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी, १०० रुग्णांवर मोतीबिंदू तसेच २० रुग्णांवर हर्निया शस्त्रक्रिया करण्यात आली.
नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला. नेत्र शस्त्रक्रिया शिबिरासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉ. चिन्मय महात्मे व त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. तसेच शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती या संस्थेचाही गौरव करण्यात आला.
लॅप्रोस्कोपिक हर्निया शस्त्रक्रिया शिबिरामध्ये डॉ. लकडावाला व शल्यचिकित्सा विभागाच्या तज्ज्ञ पथकाने २० रुग्णांवर यशस्वी हर्निया शस्त्रक्रिया केल्या. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना कमी वेदना, जलद पुनर्वसन व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा उपलब्ध झाल्या.
शिबारात निरोगी जीवनशैली, रक्तदानाचे महत्त्व, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, माता-बाल आरोग्य, पोषण व स्वच्छता याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाने लाभार्थी नोंदणी, समुपदेशन, जनजागृती व शिबिर व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
रक्तदान चळवळीला चालना देण्यासाठी रुग्णालय परिसरासह विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानादरम्यान एकूण २०० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित उपक्रमामध्ये सर्व संबंधित विभागप्रमुख, प्राध्यापक, निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, परिचारिका, विद्यार्थी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी समन्वयाने कार्य करून उपक्रम यशस्वी केला आहे.
आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया, रक्तदान, आधुनिक निदान सेवा आणि व्यापक जनजागृती यांचा समन्वय साधणारे हे शिबीर समाजाभिमुख आरोग्यसेवेचे प्रभावी उदाहरण ठरले असल्याची भावना डॉ. अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रेडिओलॉजी विभागातील अत्याधुनिक मॅमोग्राफी युनिटचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होणार असून बारामती व परिसरातील महिलांना आधुनिक निदान सेवा उपलब्ध होणार आहे.