

पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) च्या वतीने पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मार्ग क्र. ९ (अ) ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचे उद्घाटन आज स्वारगेट येथील बसस्थानकात पुणे महानगरपालिकेच्या **महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी **PMPML चे संचालक मा. अजय खेडेकर उपस्थित होते.
या विशेष पर्यटन बस सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी मुळशी धरण, पळसे धबधबा आणि नयनरम्य सेल्फी पॉईंट अशा आकर्षक पर्यटनस्थळांचा सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांनी सांगितले की, “PMPML चा हा उपक्रम पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त असून पावसाळी पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. सुरक्षित, किफायतशीर आणि नियोजनबद्ध पर्यटनाची संधी उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविकांनी देखील या विशेष पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यावा, यासाठी त्यांच्यासाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात यावे,” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी PMPML चे संचालक मा. अजय खेडेकर यांनी महामंडळाच्या पर्यटन बस सेवेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास वाहतूक व्यवस्थापक श्री. यशवंत हिंगे, जनसंपर्क अधिकारी श्री. नागेश गायकवाड तसेच PMPML चे अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळ्यातील निसर्गरम्य स्थळांचा सुरक्षित व संस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी PMPML च्या ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.