सध्या संपूर्ण देशभरात करोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. दिवसागणिक करोनाबाधितांचे प्रांत वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. अश्यातच, आता मुंबई महानगपालिकेने देखील तयारी सुरू केली असून, काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.
आयुक्त इक्बाल चहल यांनी आज एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महानगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.
त्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 5,880 नवीन करोना व्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 35,199 वर पोहोचली आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांना देखील करोना नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.