कोहमारा येथील मुर्दोली जंगल परिसरात काल (दि.१०) रात्री १० वाजेच्या सुमारास कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाला. त्याला आज (दि.११) सकाळी रेस्क्यू करीत उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा येथे आणताना वाटेतच वाघाचा मृत्यू झाला.
सदर नर वाघ हा नवेगाव नागझिरा मधील T 14 वाघिणीचा २ वर्षाचा बछडा होता. कारच्या धडकेत हा वाघ गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पायाला व पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती.
या अपघाताची माहिती वनविभाग गोंदियाला मिळताच वनविभागाने रात्री पासूनच त्या वाघाला शोधण्याचे कार्य सुरु केले होते. सकाळी ५ वाजेपासून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले.
यामध्ये वाघाला सकाळी जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या वाघाचे शवविच्छेदन नागपूरला गोरेवाडा येथे करण्यात येणार असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुर्दोली जंगल परिसरात नेहमी वाघांचे व इतर जंगली प्राण्यांचे आगमन होते. सदर अपघात झालेला परिसर हा नागझिरा-नवेगाव कॉरिडॉर मधून जातो यामुळे विभागाने काही उपाय योजना करावी अशी वन्य प्रेमींची मागणी आहे.