पानशेत धरणात चांगला पाऊस झाल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पानशेत धरणाच्या पॉवर हाऊसमधून 600 क्युसेकने पाणी सोडणात येत होते. आता, धरणाच्या सांडव्यावरून 977 क्युसेक असे एकूण 1 हजार 577 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
पानशेत धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे खडकवासला धरणात जमा होत आहे. दरम्यान, वरसगाव धरण सुद्धा भरण्याच्या मार्गावर असून धरण 97.07 टक्के भरले आहे. पावसाच्या आगमनासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खडकवासला प्रकल्पातील धरणांत अत्यल्प पाणीसाठा होता. त्यामुळे पाऊस पडेल की नाही, धरणे भरतील का? अशी धाकधूक निर्माण झाली होती.
धरणे तळाला गेल्यामुळे पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यात कपात करण्यात आली. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली.
शहराला खडकवासला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांचा समावेश खडकवासला प्रकल्पात होतो.
खडकवासला धरणात शनिवारी दिवसभरात 1 मिमी, पानशेतमध्ये 5 मिमी, वरसगावमध्ये 5 मिमी आणि टेमघर धरणात 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.