ठाकरे गटाला आणखी एक धक्का; माजी आमदार तुकाराम काते यांचा शिंदे गटात प्रवेश

Photo of author

By Sandhya

ठाकरे गटाला आणखी एक धक्का

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून गळती होण्याचे प्रमाण काही केल्या थांबत नाही. अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काते यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला. एका  वर्तमानपत्राने याविषयीची माहिती दिली आहे.

माजी आमदार तुकाराम काते यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व बीएमसीच्या माजी नगरसेविका समृद्धी काते यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. तुकाराम काते हे मुंबईतील अणुशक्तीनगरचे माजी आमदार असून ते ठाकरे गटाचे विद्यमान शाखाप्रमुख होते.

तर समृद्धी काते या उपशाखाप्रमुख होत्या.   शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुकाराम काते यांनी, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महादेखील राष्ट्र आणि मुंबईच्या कायापालटात योगदान देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला.” असे म्हटले आहे.

तर दुसरीकडे, शनिवारी मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

विशेष म्हणजे यातील बहुतांश नगरसेवक हे काँग्रेसच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा मतदारसंघ असलेल्या धारावीतील आहेत. मुंबईतील काँग्रेस नगरसेवकांनी एवढ्या मोठ्या संख्येने शिंदे सेनेत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईतील काँग्रेसच्या सात माजी बीएमसी नगरसेवकांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये सायन कोळीवाड्यातील नगरसेविका पुष्पा कोळी, चांदिवलीतील वाहिद कुरेशी, ज्योत्स्ना परमार, धारावीतील कुणाल भास्कर शेट्टी, बब्बू खान, कुणाल माने आणि त्यांच्या पत्नी गंगा माने अशा नगरसेवकांचा समावेश आहे.

Leave a Comment