जनता आता पाहत आहे. वेगवेगळ्या पक्षात कशा घडामोडी चालल्या आहेत. महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी व युवक सुखी नाही. ज्यांना आम्ही स्वतःचे नेते म्हणत आहोत. ते आज वेगळा विचाराने वागत असल्याचे दिसते.
जनस्वराज्य यात्रा इंदापूर तालुक्यात आल्यानंतर निमगाव केतकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांची बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत जंगी स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्रावणी सोमवार (दि. 28)निमित्ताने ग्रामदैवत श्री केतकेश्वर महाराज मंदिरात दुग्धाभिषेक घालण्यात आला. मंगळवारी पुण्यातील सांगता सभेत पक्षाची ठोस भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दीड महिन्यांपासून विठ्ठलाला साकडे घालून जनतेचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी जनस्वराज्य यात्रा काढली आहे. जनतेचे राज्य येण्यासाठी तसेच महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेले शेतकऱ्यांचे राज्य येण्यासाठी रासपच्या वतीने जनस्वराज्य यात्रा काढली आहे.
याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या वतीने देशभर ही यात्रा काढून 543 लोकसभा मतदारसंघात प्रचार यात्रा चालू केल्या आहेत. शिवाय 29 ऑगस्ट रोजी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे एक लाख कार्यकर्ते जमा होतील.
यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, माऊली सलगर, किरण गोफणे, तानाजी शिंगाडे, सर्जेराव जाधव, ऍड. सचिन राऊत, तात्यासाहेब वडापुरे, संदीप भोंग, गोरख आदलिंग, माणिक भोंग, ऍड. श्रीकांत करे, संतोष घनवट, दादासाहेब शेंडे, यांच्यासह आदी उपस्थित होते.
विधानसभेला तरुण उमेदवार द्यावा राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा निमगाव केतकीत आल्यानंतर यावेळी उपस्थित युवकांनी विधानसभेला तरुण चेहऱ्याला पक्षातून संधी द्यावी, अशी मागणी केली.