गुणवत्ता निकषानुसार काम न झालेला सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा पिलर पाडण्यात आला असून, निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराच्या विरोधात सोमवारी (दि.28) मनसेने आंदोलन करत पिलरला श्रद्धांजली अर्पण केली.
सिंहगड रस्त्यावर महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. यात ज्या भागात खांबाचे काम पूर्ण झाले आहे तेथे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे.
संतोष हॉल चौक ते राजाराम पूल या दरम्यान गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता महापालिकेकडून वारंवार तपासली जाते. त्यामध्ये संतोष हॉल चौक ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या दहा पिलरची तपासणी झाली.
हिंगणे येथील एका पिलरच्या सिमेंटची गुणवत्ता ’एम 35’ असणे आवश्यक असताना ती ’एम 30’ इतकी असल्याचे आढळून आले. त्याबाबतचा अहवाल प्रकल्प विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर तेथील काम बंद करण्यात आले.
महापालिकेच्या सूचनेनुसार ठेकेदार कंपनीने गुणवत्ता निकषानुसार काम न झालेला पिलर कापडाने झाकून सोमवारी पाडला. त्यानंतर मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी पिलरसमोर आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी पिलरला पुष्पहार घालून त्याला श्रद्धांजली अर्पण केली.