Overwhelming response from across the country and abroad to the collective online recitation of ‘Pasaydan’ under Mayor Manjusha Nagpure’s initiative, ‘Pune Pratham-Sevavari 2026’.

Photo of author

By Sandhya

महापौर मंजुषा ताई नागपुरे यांच्या संकल्पनेतील ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ अंतर्गत सामूहिक ऑनलाईन पसायदानाला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक; लाखो भाविकांनी विश्वशांतीच्या प्रार्थनेत मिसळला स्वर

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्वकल्याणाच्या संदेशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा ताई नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ अंतर्गत आयोजित सामूहिक ऑनलाईन पसायदान पठणाला देश-विदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी (दि. १०) रात्री ९ वाजता भवानी पेठ येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मुक्कामस्थळ तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामस्थळी सामूहिक पसायदानाचे पठण करण्यात आले.

मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात “आता विश्वात्मके देवे…” या पसायदानाच्या मंगल स्वरांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. प्रत्यक्ष उपस्थित हजारो वारकरी तसेच डिजिटल माध्यमातून पुणे, महाराष्ट्र आणि देश-विदेशातील लाखो भाविकांनी विश्वशांती, मानवता आणि सर्वांच्या कल्याणासाठी एकत्रित प्रार्थना केली.

यावेळी केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, महापौर मंजुषा ताई नागपुरे, स्थायी समिती सभापती श्रीनाथ भीमाले, सभागृहनेते गणेश बिडकर, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त माधव जगताप, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी प्रमुख राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, चैतन्य लोंढे, डॉ. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर मंजुषा ताई नागपुरे म्हणाल्या, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान ही केवळ प्रार्थना नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा सार्वकालिक संदेश आहे. ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’च्या माध्यमातून परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालत वारकरी संप्रदायाचा समता, सेवा, भक्ती आणि विश्वबंधुत्वाचा विचार देश-विदेशातील प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. सामूहिक पसायदानाच्या माध्यमातून विश्वशांती, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ व्हावा, हीच आमची मनापासूनची अपेक्षा आहे.”

महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी सांगितले की, आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समता, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा जीवनमंत्र आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील विश्वकल्याणाचा संदेश आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न असून प्रत्येक घरात, प्रत्येक मनात आणि जगभरातील प्रत्येक भाविकापर्यंत विश्वशांतीची प्रार्थना पोहोचावी, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.

या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाल्याबद्दल महापौरांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यामधून पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि संतपरंपरेतील निसर्गप्रेमाचा संदेश देण्यात आला.

प्रत्यक्ष आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांतून झालेला हा व्यापक सहभाग वारकरी परंपरेचे जागतिक स्वरूप, संतवाङ्मयाविषयी समाजातील अढळ श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यात्माशी जोडले जाण्याची वाढती जाणीव अधोरेखित करणारा ठरला. विश्वशांती, मानवता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमाला लाभलेला देश-विदेशातील उत्स्फूर्त प्रतिसाद हा ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ च्या यशस्वी वाटचालीतील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे भवानी पेठेतील मुक्कामस्थळी दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर मंजुषा ताई नागपुरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक ऑनलाईन पसायदान उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातून विश्वबंधुत्व, मानवता आणि सर्वांच्या कल्याणाचा संदेश जगाला मिळाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा संदेश घराघरात आणि जगभर पोहोचविणारा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. परंपरा आणि तंत्रज्ञानाचा असा सुंदर संगम वारकरी संप्रदायाचा विश्वबंधुत्वाचा संदेश नव्या पिढीपर्यंत आणि जागतिक स्तरावर पोहोचविण्यास निश्चितच मोलाची भूमिका बजावेल.”

Leave a Comment

You cannot copy content of this page