काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत.
आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असणार आहे.
देवेंद्र फडणवीस समितीचे सदस्य असल्याने बैठकीला हजर राहणार आहेत. आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
आजच्या या केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
खास करून राजस्थानच्या उमेदवाराबद्दल बैठकीत मंथन होणार असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशात वापरण्यात आलेला फॉर्म्युला भाजप राजस्थानात वापरणार का? याची देखाल उत्सुकता आहे.
4 दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह समितीतील इतर सदस्य या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत.
5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 2023च्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
मिझोराममध्ये 17 डिसेंबर, छत्तीसगडमध्ये 3 जानेवारी, मध्य प्रदेशमध्ये 6 जानेवारी, राजस्थानमध्ये 14 जानेवारी आणि तेलंगणामध्ये 16 जानेवारीला विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.
नवी दिल्लीत होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीत राजस्थान, मध्य प्रदेश-छत्तीसगडमधील उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.