माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १४४ ची नोटीस जारी केली आहे. ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक शांततेचा भंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ठाणे पोलिसांनी त्यांना ही नोटीस जारी केली आहे.
मुंब्रा येथील शिवसेना शाखा शिंदे गटाकडून नुकतीच जमीनदोस्त करण्यात आली आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी आज (दि.११) संध्याकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत.
त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बॅनर्स लावले होते. ते फाडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून ही दक्षता घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती.
तसेच, शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. आज उद्धव ठाकरे जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापले आहे.