CRIME NEWS : गणेश पेठेत तरुणाचा खून; फ्लेक्स फाडणे बेतले जीवावर

Photo of author

By Sandhya

गणेश पेठेत तरुणाचा खून; फ्लेक्स फाडणे बेतले जीवावर

दादागिरी, तसेच फ्लेक्स फाडल्यामुळे गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

तुषार राजू कुंदुर (वय 21), आशुतोष संतोष वर्तले (वय 20, दोघेही रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिद्धार्थ नंदकुमार हादगे (वय 29, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

रविवारी मध्यरात्री सिद्धार्थ हादगे आणि सुमित चव्हाण गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी तुषार कुंदुर, आशिष कुंदुर, हर्षल पवार याच्यासह साथीदारांनी वैमनस्यातून हादगे याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. उपचारांपूर्वीच सिद्धार्थ याचा मृत्यू झाला.

गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. आरोपी कुंदुर कोथरूड भागात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार अजय थोरात आणि अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी सिध्दार्थने भांडणातून तुषार कुंदुर आणि त्याचा भाऊ आशिष कुंदुर यांच्यावर शस्त्राने वार केले होते. त्यानंतर हादगे हा तुषार आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करीत होता. गेल्या महिन्यात 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली होती.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक रमेश तापकीर, अजय थोरात, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, नीलेश साबळे, दत्ता सोनवणे आदींनी ही कामगिरी केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page