सध्या राज्यात बाजारबुणग्यांची गर्दी झाली असून ही मंडळी मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा दुरूपयोग करून कायदा हातात घेऊन चुकिची कामे करीत आहेत.
मंत्रालयात फाइलवर पैसे गोळा करणारा दलाल आणि गेली साडेचार वर्षे तालुक्यातून गायब असणाऱ्या भ्रष्टाचारी व्यक्तीने आता निवडणूकांच्या तोंडावर उगवून बोगस आरोप करण्यापूर्वी स्वतः आणि स्वतःच्या आजुबाजुच्या बोगस लोकांकडे पहावे अशी टीका माजी आमदार विजय शिवतारेंवर करीत आमदार संजय जगताप यांनी बोगस तक्रारींवर बोगस कारवाई करू पाहणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनाही जाब विचारणार असून वेळ पडल्यास याबाबत तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही आ संजय जगताप यांनी दिला.
सासवड येथील काँग्रेस कमिटीमध्ये आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेत माजी आमदार शिवतारे यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघात पलूस कडेगाव मधील सुमारे ३२ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे असल्याच्या आरोपावर बोलताना शिवतारेंचे निकटवर्तीय व शिंदे गटाचे पुरंदरचे तालुकाप्रमुख हरीभाऊ लोळे यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सासवड आणि पानवडी या दोन ठिकाणी नावे असून त्यांनी २०१९ मध्ये दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचा तसेच तालुका युवाप्रमुख अविनाश बडदे यांचेही सासवड आणि कोडीत बु येथे मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा सादर करून यांच्यावर शासकीय अधिका-यांनी कारवाई करण्याची मागणी केली.
बाजारबुणग्यांचे ऐकून शासकीय अधिका-यांनी पुरंदर तालुक्यातील ३० ते ३२ हजार मतदारांना नोटीस पाठविल्या आहेत. मात्र याबाबत बोगस मतदार असल्याबाबतचा अर्ज भरला नसून त्यावर हरकतदाराचेही नाव नाही.
सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप देऊन संविधानाने दिलेला सर्वांत मोठा मतदानाचा अधिकार हिरावून घेवू नये. शासकीय अधिकाऱ्यांना यापुर्वी अनेकदा दुबार आणि मयतांची नावे कमी करण्याबाबत पत्र दिली. यावर अद्यापही अंमलबजावणी झाली नाही., मात्र खोट्या तक्रारींवर अधिकारी तातडीने कारवाई करू पाहत असल्याच्या प्रकाराबाबत आ संजय जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महाविकास आघाडीचे समन्वयक नंदकुमार जगताप, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, युवकचे गणेश जगताप, माऊली यादव, चेतन महाजन तसेच महादेव टिळेकर, विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाणे, भाग्यवंत म्हस्के आदी उपस्थित होते.
चोराच्या उलट्या बोंबा
यावेळी आ संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत शिवतारेंच्या शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष लोळे आणि युवक अध्यक्ष बडदे यांचीच नावे दोन वेगवेगळ्या गावांत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध केले त्यामुळे बोगस आरोप करणा-या शिवतारेंची गत म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” असल्याचेही आ जगताप म्हणाले.
प्रशासकीय इमारत अडकली लाल फितीत….
यावेळी बोलताना आ संजय जगताप यांनी, पुरंदरची नवीन प्रशासकीय इमारत तयार आहे, नवीन शासकीय इमारतीत कार्यालये सुरू करण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला.
मात्र शिवतारेंनी केलेल्या उदघाटनाच्या फार्समुळे सर्वसामान्य नागरीकांची अडचण होत आहे. सध्याच्या तहसील आणि प्रांत कार्यालयात नागरीकांना पिण्याचे पाणी मिळत नाही की बसायला जागाही नाही असे सांगितले. त्यामुळे पुरंदरची नवीन प्रशासकीय इमारत लाल फितीत अडकली आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.