सातारा व माढा मतदारसंघांवर राष्ट्रवादीचाच हक्क असून, हे दोन्ही मतदारसंघ आपल्यालाच मिळावेत, अशी आग्रही मागणी या दोन्ही मतदारसंघांतील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बैठकीत केली.
यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी ही पदाधिकाऱ्यांना मागणीला पाठिंबा देत आग्रह कायम ठेवला, तर महायुतीच्या जागा वाटपात सातारा, माढ्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेणार असून, या दोन्ही जागा सोडणार नाही, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
दरम्यान, साताऱ्यातून नितीन पाटील, तर माढ्यातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली.
या बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, मकरंद पाटील, संजय शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, अमित कदम, प्रभाकर घार्गे, प्रमोद शिंदे, शिवाजीराव महाडिक,
नितीन भरगुडे-पाटील, दीपक साळुंखे यांच्यासह तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सुरुवातीला प्रमोद शिंदे, शिवाजीराव महाडिक, नितीन भरगुडे-पाटील, अमित कदम, दीपक आबा साळुंखे, संजय शिंदे यांनी आपले विचार मांडले.
यामध्ये त्यांनी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीलाच मिळाला पाहिजे. १९९९ पासून हा मतदारसंघ पक्षाकडे असून, पक्षाची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनीकडे आग्रही भूमिका मांडून हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीलाच घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भूमिका मांडली.
यावर रामराजे नाईक निंबाळकर व मकरंद पाटील यांनीही आपल्या भाषणात सातारा व माढा मतदारसंघांत राष्ट्रवादीची ताकद असून, दोन्ही जागा आपल्यालाच मिळतील. उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
यावर सुनील तटकरे म्हणाले, ‘‘सातारा व माढा हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच राहतील, कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही जागा आम्ही सोडणार नाही. कर्जतच्या मेळाव्यात आम्ही साताऱ्याची घोषणा केली होती.’’
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सातारा मतदारसंघातून नितीन पाटील, तर माढा मतदारसंघातून संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी देण्याची मागणी प्रमोद शिंदे, शिवाजीराव महाडिक, नितीन भरगुडे-पाटील, दीपक आबा साळुंखे, आमदार संजय शिंदे यांनी केली.
त्यावर श्री. तटकरे यांनी याबाबत जागा वाटप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच ही नावे निश्चित केली जातील. या दोघांच्या नावाला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनाच उमेदवारी देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.