घराणेशाहीवरून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका करणारे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात ठाकरे घराण्यावर लोकांनी प्रेम केले आहे. जोपर्यंत ठाकरे तुमच्यासोबत होते तोपर्यंत ते चांगले आणि विरोधात गेले कि घराणेशाहीचा पुरस्कर्ते का?
असा सवाल करत ही डबल ढोलकी वाजवणे लोकांना दिसते. तेव्हा हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेतून अमित शहा यांनी विरोधी पक्षांच्या घराणेशाहीवर टीकास्र सोडले होते. त्यासंदर्भात दानवे यांनी एक्स या समाजमाध्यमावरून शाह यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शाह यांनी परिवारावादावर बोलताना बरीच धुळफेक केली. मात्र ते स्वत: उभे असलेल्या व्यासपिठावर पाहायला विसरले वाटते, असे सांगत व्यासपिठावरील घराणेशाहीचे उदाहरण द्यायचे झाल्यास देवेंद्र फडणवीस (शोभाताई फडणवीस), पंकजा मुंडे (गोपीनाथ मुंडे), अशोक चव्हाण (शंकरराव चव्हाण), संतोष दानवे (रावसाहेब दानवे) यांच्याकडे तुम्हाला डोळेझाक करता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.