
सासवडमध्ये २२ मे पासून ‘पुरंदर कृषी एक्स्पो’… आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी सन्मान
पुरंदर तालुक्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी ‘शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान’च्या वतीने २२ ते २५ मे २०२६ या कालावधीत भव्य ‘पुरंदर कृषी एक्स्पो २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. सासवड येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील., कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे., अशी माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिवंगत चंदुकाका जगताप यांच्या प्रेरणेतून साकारलेल्या या प्रदर्शनात १६० व्यावसायिक स्टॉल्ससह महिला बचत गटांसाठी ५० विशेष स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे आधुनिक ‘ड्रोन तंत्रज्ञान’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ चा शेतीतील वापर असणार आहे. तसेच, उच्च जातीच्या पशुधनाचे भव्य पशुप्रदर्शन, शेती उपयोगी अवजारे आणि ट्रॅक्टर्सची स्वतंत्र दालने येथे पाहायला मिळतील.
शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी दररोज तज्ज्ञांच्या व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, डॉ. सोमनाथ माने, डॉ. विवेक भोईटे यांसारखे दिग्गज पशु आहार, ऊस शेती आणि फळबाग व्यवस्थापनावर मार्गदर्शन करतील. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे.
प्रदर्शनास भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी ‘झुणका-भाकर’ भोजनाची मोफत सोय असून, दररोज लकी ड्रॉद्वारे १०० शेती उपयोगी अवजारे वाटली जाणार आहेत. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी एका भाग्यवान शेतकऱ्याला ‘फळबागेसाठी उपयुक्त ट्रॅक्टर’ बंपर बक्षीस म्हणून दिला जाईल. या प्रदर्शनासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि संत सोपानकाका बँक यांनी सहकार्य केले आहे.
या पत्रकार परिषदेला सेवानिवृत्त कृषी अधिकारी संभाजी गरूड, पुरंदर मिल्कचे संचालक विलास जगताप, संत सोपानकाका बँकेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि रवींद्रपंत जगताप उपस्थित होते. तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.