मागील काही दिवसांपासून ईडीकडून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावरुन केंद्र सरकार ईडीचा वापर आपल्या स्वार्थासाठी करत असल्याची टीका वारंवार करण्यात आली. यातच आता लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठे आश्वासन दिले आहे.
पश्चिम बंगालमधील लोकांकडून लुटलेले आणि सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये लोकांना परत मिळावा यावर आपण काम करीत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांच्याशी मोदी यांनी दूरध्वनी संभाषण केले.
ईडीने पश्चिम बंगालमधून जप्त केलेली गैरव्यवहाराशी संबंधित रक्कम लोकांना परत करण्याचा विचार असल्याचे मोदी यांनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले, अशी माहिती भाजपच्या नेत्याने दिली.
एका भाजप नेत्याने सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी ‘राजमाता’ अमृता रॉय यांना सांगितले की, “भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे आणि ईडीने त्या भ्रष्ट लोकांकडून जी काही मालमत्ता आणि पैसा जप्त केला आहे, तो गरीब जनतेला परत केला पाहिजे. हे सुनिश्चित करण्यासाठी तो कायदेशीर पर्याय शोधत आहे.”
“भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी काँग्रेसला फटकारले आणि म्हटले की ज्यांनी आम आदमी पार्टी (आप) विरोधात तक्रार केली होती त्यांनी आता आपली भूमिका बदलली आहे. मात्र, त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. यावरून हे दिसून येते की त्यांची प्राथमिकता देश नसून सत्ता आहे.”
भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला पुढे भाजप नेत्यांनी सांगितले की, “राज्यात नोकऱ्या देण्यासाठी तृणमूलने सुमारे 3,000 कोटी रुपये लाटले.
एकीकडे भाजप देशातून भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी मतदान करेल,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.