अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारीही दिली आहे. मात्र, बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांच्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत.
तसेच, बच्चू कडू यांनीही, सर्वच मोठ्या नेत्यांनी एकत्रित होऊन या निवडणुकीकडे बघायला हवे. आपल्या पेक्षाही ज्याला पाडायचे आहे, ते टार्गेट लक्षात घेऊन समोर जायला हवे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार निवडून येतो हे महत्वाचे नाही, तर नवनीत राणा यांना पाडणे महत्वाचे आहे, असे म्हटले आहे.
आता दाखवू ना पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिक पणात? -रविराणा यांनी नुकतेच बच्चू कडू यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांना, अमरावतीतील भाजपच्या लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते.
यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, “घरात घुसून मारण्याची भाषा, कुठेही जाता तर पैसेच खाऊन जातात, आता दाखवू ना पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिक पणात? म्हणजे खोके घेतल्या शिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही, अरे असं असंत तर आम्ही कधीच आमचं चित्र पालटलं असतं.
तुमच्या सारखं स्वाभिमानी पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधला नसता. तुमचे राजकारण आहे. तुमचा प्रकार आहे. इमानदारीने राहू आणि इमानदारीने काम करू.” कडू टीव्ही 9 सोबत बोलत होते.
400 पार आहेत, एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही! -काल भाजप नेते नवनीत राणा यांच्यासोबत दिसले, ते त्यांचा प्रचार करतील? यासंदर्भात बोलताना कडू म्हणाले, त्यांनी कार्यकर्ता म्हणून काय करावे? काय करू नये? किती लाचारी पत्करावी? जेव्हा पक्ष कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा कार्यकर्त्यांनीही काही क्षणापुरता पक्षाचा विचार करू नये.
तसेही 400 पार आहेत. त्यामुळे एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही. 300 खासदार आले तर मोदी सांहेबांची सत्ता वाचणारच आहे. त्यामुळे हा अतिरेक थांबवा. अशी मी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही विनंती करेन, असेही कडू यांनी म्हटले आहे.