


विषारी हातभट्टी दारूकांड प्रकरणी शिवसेनेचे हडपसर पोलीस स्टेशनसमोर तीव्र ठिय्या आंदोलन
अवैध दारू हातभट्ट्यांचे जाळे तातडीने उध्वस्त करण्याची मागणी
पुणे -हडपसर परिसरातील पांढरे मळा येथे विषारी हातभट्टी दारूमुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत संतापजनक घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाली असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून संपूर्ण हडपसर परिसर अवैध हातभट्टीमुक्त करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने हडपसर पोलीस स्टेशनसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या विषारी हातभट्टी दारूकांडामध्ये राहुल क्षिरसागर, विजय शर्मा, अरुण डाडर, अशोक चव्हाण यांच्यासह एकूण पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण हडपसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गरीब व कष्टकरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असून अनेक कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
शिवसेनेच्या वतीने आंदोलनादरम्यान आरोप करण्यात आला की, हडपसरसह पुणे शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू हातभट्ट्या सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र, तरीदेखील या अवैध रॅकेटवर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या अवैध धंद्यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, कोणते अधिकारी गुंतलेले आहेत याची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्याची मागणी शिवसेनेने केली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. तसेच शिवसेनेच्या वतीने या कुटुंबीयांना सर्वतोपरी आर्थिक सहाय्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले,“विषारी दारू पाजून गरीब व कष्टकरी नागरिकांचा जीव घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. हडपसरसह पुणे शहरातील अवैध हातभट्ट्या आणि दारू माफियांचे जाळे तात्काळ उध्वस्त झाले पाहिजे. या रॅकेटला संरक्षण देणाऱ्या संबंधितांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा शिवसेना आणखी तीव्र आंदोलन छेडून रस्त्यावर उतरेल,” असा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला.
तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, हडपसर परिसर पूर्णपणे अवैध हातभट्टीमुक्त करण्यात यावा, तसेच संपूर्ण पुणे शहरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू विक्री व हातभट्ट्यांवर तातडीने मोठी कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी शिवसेना आगामी काळात अधिक तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला,या आंदोलनावेळी उपजिल्हाप्रमुख अमर घुले, पंकज कोंद्रे, दत्ता खवळे, अभिजीत बोराटे, दीपक कुलाल, प्रवीण हिलगे, संदेश पावस्कर, अनिकेत सपकाळ, अक्षय तारू, शितल गाडे, शंतनू सरकार, अमित दाभाडे, प्रकाश कालगुडे, माऊली साळुंखे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.