मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महायुतीच्या उमेदवारांचा एकजुटीने प्रचार करा…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मतभेद विसरून महायुतीच्या सर्व उमेदवारांचा जोमाने प्रचार करण्याबरोबरच शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दिल्या.

कालच्या बैठकीत नेत्यांनी भाजपविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर आज त्या दृष्टिकोनातून सर्वांची समजूत काढण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून गेले काही दिवस सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी कालपासून दोन दिवस पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची विभागनिहाय माहिती घेतल्याचेही सांगण्यात आले.

कालच्या चर्चेत बहुतेक नेत्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आपल्या हक्काच्या सर्व जागा आपणास मिळायला पाहिजेत, असा आग्रह धरला होता.

भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांची उमेदवारी बदलल्यामुळे तसेच आपल्या काही जागा काढून घेतल्यामुळे लोकांमध्ये पक्षाबद्दल चुकीचा संदेश गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

नेत्यांमधील या नाराजीची आपण दखल घेतल्याचे तसेच पक्षाचा आणि पक्षातील प्रत्येक नेत्याचा सन्मान राखण्याची ग्वाहीही देण्यात आली. महायुतीमधील समन्वय आणि प्रचाराच्या मुद्यांवरही चर्चा झाली.

शिवसेनेचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी रणनीती बैठकीमध्ये आखण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, संजय शिरसाट यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment