राजू शेट्टी : …तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?

Photo of author

By Sandhya

राजू शेट्टी

शिवसेना उमेदवारी देणार असे सांगत सहा महिने चर्चा करीत राहिली. अखेर मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर उमेदवारी देवू असा प्रस्ताव आहे. त्यास होकार दिला असता तर स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागला असता, पण ते शक्य नव्हते.

मी शिवसेनेकडून निवडणूक लढावे असे संजय राऊत म्हणत असतील तर ते माझ्या स्वाभिमानी संघटनेत येणार आहेत का असा प्रतिप्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

शेट्टी म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात तुमची उमेदवारी जाहीर करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. पण त्यांचे मशाल चिन्ह घेणे म्हणजे पक्षात प्रवेश होता. ते मान्य नव्हते. सोयीचं राजकारण करायचे असते तर कुठल्या तरी राजकीय पक्षात गेलो असतो.

महाविकस आघाडीसोबतच्या चर्चेबाबत ते म्हणाले, भाजपच्या विचारधारेला आमचा विरोध आहे. जाती जातीमध्ये भांडणे लावली जात आहेत. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शक्तिपीठसाठी जमिनी अधिग्रहण करण्यात येणार आहेत. या समान मुद्द्यामुळे चर्चा केली होती. त्यांनी आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिला होता.

महाविकास आणि महायुतीमध्ये मला जायचं नव्हत. सत्याजित पाटील यांचे वडील कारखान्याचे गेली २० वर्षे उपाध्यक्ष आहेत. साखर कारखान्याचे प्रतिनिधी एकत्र येऊन माझ्यासारख्या शेतकरी नेत्याचा पराभव करण्याच्या हालचाली कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. सांगलीचा निर्णय वसंतदादा यांचे घराणे संपवण्यासाठी घेतला आहे की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात सहा जागा लढवण्यावर ठाम आहे. त्यापद्धतीने सांगली, परभणी, माढा, बुलढाणा येथे रविकांत तुपकर उमेदवार देण्याबाबत विचार सुरू आहेत. कोल्हापूरबाबत कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना आहेत. तुपकर यांच्या प्रचाराला जाण्यास वेळ मिळेल असं वाटत नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Comment