महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही कामाचे नाहीत, जो मराठा आरक्षण सगसोयरे कायद्याच्या बाजूने असेल त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहील, असे वक्तव्य मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले. सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आयाबहिणींच्या पाठीवरचे बळ आणि महायुती सरकारने केलेली फसवणूक मराठ्यांनी विसरू नये. कधीकधी निवडणुकीत उभे राहण्यापेक्षा पाडण्यात विजय असतो, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. सोमवारी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील गोपीनाथ गडाला सदिच्छा भेट दिली.
या ठिकाणी त्यांनी पुष्पहार अर्पण केला व त्यानंतर जरांगे पाटील यांचे तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. मानोरी, मन्हळ, पांगरी येथे जररांग पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी मनोज जरांगे-पाटील यांना पत्रकारांनी नाशिक लोकसभेच्या निमित्ताने प्रश्न विचारले असता त्यांनी मराठा समाजाचा कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही, मात्र लोकसभा जरी गेली तरी विधानसभेला आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
कुणाला निवडून आणायचे व कुणाला मतदान करायचे हे मी कुणालाही सांगणार नाही. मात्र, मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करावे व महणजे या मतांवरती काहीतरी चमत्कार होऊ शकेल असेही जररांगे-पाटील म्हणाले. यावेळी करण गायकर, विलास पंगारकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर जरागे पाटील भरवस फाटा येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.