BIG NEWS : प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार…

Photo of author

By Sandhya

प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ऑटो रिक्षांसह शहरात विविध ठिकाणी विनापरवाना डिजिटल लावून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार वैभव बिराजदार यांनी आचारसंहिता कक्षप्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे केली आहे.

त्यावर तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

तरीही शहरातील ऑटो रिक्षांवर (क्र. एम एच १३ बी व्ही १६२८, एमएच १३ जी ९६८०) विनापरवाना दोन बाय दोन फूट आकाराचे डिजिटल लावून प्रचार केला जात आहे.

त्यावरील संपर्क क्रमांक ७०६६६२४२२२ हा क्रमांक डायल केल्यावर कॉलर आयडीवर काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आढळून येत आहे.

तसेच शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर सोशल फोरमने शहरातील महापौर बंगला, सात रस्ता चौक, शासकीय विश्रामगृह संरक्षण आवार, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल, डफरीन चौक, नवल पेट्रोल पंपानजीक या ठिकाणी विनापरवाना तीन बाय पाच फूट आकाराचे डिजिटल लावून आचारसंहितेचा भंग केला आहे.

त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे बिराजदार यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावर आचारसंहिता कक्षप्रमुख कुंभार यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment