मुंबई बाजार समितीतील कथित घोटाळाप्रकरणी राजकीय द्वेषातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हा रडीचा डाव खेळला जात आहे; पण मी परिणामांना घाबरत नाही.
लोकसभा निवडणूक होईपर्यंत विरोधकांनी थांबावे. त्यानंतर मला फासावर चढवायचे तर चढवा, अशा शब्दात आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.
मला मिळणारे पाठबळ पाहून हे सगळे आरोप एकामागून एक केले जात असून, यातील एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई बाजार समितीतील कथित घोटाळ्याप्रकरणी आमदार महेश शिंदे व नरेंद्र पाटील यांनी केलेल्या आरोपाला आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत उत्तर दिले. या वेळी माजी सभापती बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मी राजकीय जीवनात कार्यकर्ता ते नेतेपदापर्यंत संघर्ष करत पोचलो आहे. कटकारस्थान करून माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा हा प्रयत्न आहे.
किमान लोकसभा निवडणूक होईपर्यंत माझ्यावर कारवाई होऊ नये, असे मला वाटते. निवडणुकीच्या निकालानंतर मला फासावर चढावा; पण मला जनतेचे पाठबळ मिळते, म्हणून माझ्यावर आरोप करून रडीचा डाव एक त्रिकूट करत आहे. मी परिणामांना घाबरत नाही.
लोकशाहीत निवडणूक होत असतानात आरोप होत राहतात; पण आता यंत्रणांचा वापर होत असेल, तर राजकीय विश्वासार्हता संपते. घोटाळ्याशी माझा कसलाही संबंध नाही.
मी एकट्याने हा निर्णय घेतलेला नाही. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. केवळ टीका करण्यासाठी त्यांचे हे सर्व चालले आहे. सध्या हीन पातळीवर राजकारण सुरू असून, द्वेष करणारी मंडळी एकत्र आली आहेत.’’
काही जण माझी राजकीय कारकीर्द अडचणीत आणणे हेच काम आहे; पण माझ्याकडे पुरावे आणि कॉल रेकॉर्ड आहेत. आम्ही ज्यांना खुर्चीवर बसविले. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. यामध्ये त्रिकूट जमले असून, काही महिन्यांपासून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत.
काहीही झाले तरी माथाडी कामगार माझ्या मागे असून, चांगले कोण आणि वाईट कोण हे त्यांना चांगले माहिती आहे. ज्या उदयनराजेंचा मी प्रचार केला. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढत आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
चार हजार कोटींच्या घोटाळ्यात मुळात त्या गाळ्यांचा ताबा बाजार समितीकडेच असून, एफएसआयचे वाटप झालेले नाही. त्यामुळे एफएसआय वाटप केला नाही. मग आमच्यावर आरोप का, असा प्रश्न त्यांनी केला.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी लोक पर्याय शोधत होते. मी अभ्यासू, निष्ठावंत आमदार आहे, लोकांची सहानुभूती मिळत असून, कदाचित त्यांना माझ्या रूपाने हा पर्याय मिळाला आहे. मुंबई बाजार समितीतील व्यापाऱ्यांपैकी एकाने सांगावे, मी भ्रष्टाचार केला आहे.
तीन, चार लोकांची चौकडी आहे. त्यांच्यातील ब्लॅकमेलर असून, तेच आरोप करत आहेत. लोकांपर्यंत सत्यता जावी, म्हणून हे सांगत आहे. या लोकसभा निवडणुकीत मला न्याय मागू द्या. निवडणूक होईपर्यंत माझ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करू नका, असे ते म्हणाले.
उदयनराजेंनी दिलेल्या गांधी मैदानावर समोरासमोर या आव्हानावर शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मी गांधी मैदानावरून शक्तिप्रदर्शन करत आलेलो आहे. उदयनराजेंविषयी मला अधिक बोलायचे नाही; पण त्यांनी चुकीच्या माणसांच्या पाठीशी उभे राहू नये.
उदयनराजेंसोबत मुंबई बाजार समितीत जाण्यास मी तयार आहे. तेथील एका जरी व्यापाऱ्याने सांगितले तरी मी म्हणाल ते हारण्यास तयार आहे.’’