‘‘मी अरविंद केजरीवाल असून दहशतवादी नाही,’’ असा संदेश आज तुरुंगातून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली.
या भेटीदरम्यान या दोन नेत्यांच्या मध्ये काच ठेवण्यात आली होती. त्यामुळे, ‘‘एखाद्या दहशतवाद्याला भेटावे, त्याप्रमाणे ही भेट झाली’’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली.
यानंतर आज मुख्यमंत्री केजरीवाल यांनी जनतेला एक संदेश पाठविला आहे. आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंग यांनी हा संदेश पत्रकार परिषदेत सांगितला. केंद्र सरकारची एका मुख्यमंत्र्याला देण्यात येत असलेली वागणूक ही केवळ मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भीतीतून देण्यात येत आहे.
परंतु मुख्यमंत्री केजरीवाल हे वेगळ्या मातीचे तयार झालेले आहे. या अन्यायाला ते योग्य उत्तर देतील. त्यांना नाउमेद करण्याचा पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मनसुबा पूर्ण होणार नाही, असा दावाही खासदार संजय सिंग यांनी केला आहे.
जनतेच्या मनात असलेला रोष पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेले असल्याचा दावा करून खासदार सिंग म्हणाले, त्यांचा सरन्यायाधीशावरही विश्वास उरलेला नाही.
त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्याचा कायदा त्यांना करावा लागला. निवडणूक रोख्यांना योग्य असल्याचे सांगून पंतप्रधानांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावाही त्यांनी केला.